आता AI उलगडणार मोडी लिपीतील दस्तऐवज
हर्षल, तन्वी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून तयार केलेले हे जगातील पहिले कृत्रिम बुद्धीमत्तेचे मॉडेल आहे ज्याने मोडी लिपीचे देवनागरीकरण शक्य झाले आणि त्यांच्या ह्या संशोधनात मला सहभाग देता आला ही माझ्याकरता नुसतीच आनंदाची नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. ************* साधारण १५-१६ वर्षांपूर्वी जेव्हा मोडी लिपीतल्या अभिलेखांच्या देवनागरीकरणासाठी OCR असलं पाहिजे हा विचार मांडला गेला तेव्हा ती कल्पना अशक्य कोटीतली वाटत होती. तसं वाटण्याचं कारण कोणत्याही मोडी अभ्यासकाला अगदी सहज कळण्यारखं आहे. जितकी मोडी कागदपत्रे तितकेच हस्ताक्षराचे नमुने. एक कागद लिप्यंतर केला म्हणजे आपल्याला मोडी लिपी कळते अश्या आनंदात असताना दुसरा मोडी कागद समोर येतो, तो आपल्या लिप्यंतराच्या ज्ञानाला आव्हान देण्यासाठीच! आधीच मोडी लिपीला भूत लिपी, पिशाच्च लिपी अशी नावं पडलेली. त्यात ती तत्कालिन लेखनिकांच्या शैलीमुळे दुर्बोध आणि कुरूप असल्याच्या अपसमजांत अडकलेली. अशी ही सुंदर, प्रवाही पण चंचला मोडी लिपी एखाद्या तांत्रिक करामतीने देवनागरीत उलगडू लागेल ही शक्यता धूसर वाटत असतानाच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या रुपाने जणू एक अदृश्य...