जुन्या कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन
प्राचीन हस्तलिखितांचे किंवा घरातील जुन्या कागदपत्रांचे जतन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कितीही सांभाळली तरी काळाचा प्रभाव कागदासारख्या नाशिवंत वस्तूवर होणार हे नक्की! आपल्या भावी पिढ्यांसाठी ही जुनी कागदपत्रे इतिहासाचे साक्षीदार म्हणून जपून ठेवायची असतील तर सर्वप्रथम ह्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी करणे अनिवार्य आहे.
स्कॅनिंग: चांगल्या ऑफिस स्कॅनरवर किंवा झेरॉक्सवाल्यांकडे कागदपत्रे स्कॅन करून मिळतात. हल्ली स्मार्टफोनकरीता देखील स्कॅनिंगची अॅप्स उपलब्ध आहेत; पण त्याचे काही तोटे आहेत. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे MP जितके असतात तितकीच क्षमता स्कॅनिंग अॅपची असते हे लक्षात असू द्या. स्मार्टफोनवर फोटो किंवा स्कॅनिंग करताना हात थरथरला तर त्याच्या परिणाम म्हणून फोटो/इमेज निकृष्ट दर्जाच्या येतात. तसेच, स्कॅनिंग करण्यासाठी फोन कोणत्या कोनात, दिशेत धरावा ह्याचे योग्य ज्ञान नसल्यास चुकीच्या पद्धतीने काढलेले फोटो किंवा इमेजेस निरुपयोगी ठरतात म्हणून झेरॉक्सवाल्यांकडून स्कॅन करून घेणे उपयुक्त किंवा साध्या स्कॅनरचा वापर करण्याइतपत कागदपत्रे लहान आकाराची नसतील तर पुराभिलेखागारांकडे मोठे स्कॅनर्स असतात, त्यांना विनंती करून पहा. अन्यथा एखाद्या स्टुडिओमध्ये फोटोच्या कॅमेऱ्याने मोठ्या आकाराचे फोटो (JPEG) काढून घ्या.
प्रत्यक्षा कागदपत्रांची काळजी कशी घ्यावी?
(१) प्रत्यक्ष कागदाचं जतन करण्यासाठी दोन ट्रेसिंग पेपर्सच्या आत एक कागद ह्याप्रमाणे रचून ठेवा. कडूनिंबाच्या वाळलेल्या पानांचा चुरा/भुकटी एखाद्या कपड्यात ठेवून तो ह्या कागदपत्रांसह ठेवा किंवा हल्ली सिलिका जेलची लहान पाकिटं मिळतात ती ठेवा. ह्या व्यतिरिक्त बाजारात इतर कुठली पावडर/औषध उपलब्ध आहे का हे चौकशी करून पहावे.
(२) कागदपत्र ज्या डब्यात/फायलीत ठेवाल त्यांना कागदपत्र चिकटून शाई निघून जाणार नाही ह्याची खबरदारी घ्या. कोरड्या आणि अंधाऱ्या जागी कागदपत्रे ठेवा पण ती जागा वरचेवर स्वच्छ करत जा. किडे-कसर लागू नये ह्यासाठी किमान सहा महिन्यांतून एकदा कागदपत्रांची पहाणी करावी.
(३) फिकट पडलेल्या कागदांमधील मजकूर लिप्यंतर/भाषांतर करुन घेतलात तर मूळ कागदासोबत त्या रुपांतराची एक प्रत ठेवा. त्यामुळे भविष्यात तो कागद पुन्हा बाहेर आला की तेव्हा तो सांभाळून ठेवायचा कि नाही ह्याचा निर्णय घेता येईल आणि नवीन पिढीसाठी उगीच निरर्थक रहस्य निर्माण होणार नाहीत.
काय करू नये?
(१) कागदपत्रे चुकूनही लॅमिनेट करू नका. लॅमिनेशन सुरूवातीला छान दिसते, कागद सुरक्षित आहे असे वाटते पण काही वर्षांतच ते प्लास्टिक वितळून कागदावर त्याचा थर चिकटून बसत व कागद वाचण्यालायक उरत नाही. लॅमिनेशनच्या प्लॅस्टिकला भेग पडून आत कागदावर कचरा, धूळ जमा होते जी स्वच्छ करणे अशक्य असते. जुने प्लास्टिक काढताना कागदाची हानी होते. लॅमिनेशन केलेल्या कागदाची विश्वासार्हतादेखील कमी होते. त्यामुळे लॅमिनेशन हा कायमस्वरुपी उपाय नहीच.
(२) फाटलेल्या कागदाला सेलोटेप लावू नये. ज्या जागी सेलोटेप लावलेली असते त्या जागेवरील कागदाचा रंग हळूहळू बदलू लागतो. सेलेटोप चांगल्या प्रतीची नसेल तर उचकटून निघण्याची शक्यता असते. अश्या निघालेल्या सेलोटेपसोबत कागदाचा मजकूराचा भागही खरवडून निघतो. सेलोटेप लावलेल्या जागी दुमड पडली तर कागद आणखी पुढे फाटत जाण्याची शक्यता असते.
कागद ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत जतन करावा पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे स्कॅन करून एक डिजिटल प्रत घेतली असेल तर वारंवार मूळ कागद हाताळण्याची गरज पडत नाही. छापिल प्रत देखील डिजिटल प्रतीवरून काढता येते. त्यामुळे अनाठायी श्रम आणि खर्च वाचतो.