मोडी वाचकांची उपेक्षा
मोडी वाचक दिवसाला २५०० ते ३००० पाने तपासू शकतील ही अशक्य कोटीतील गोष्ट आहेच पण ज्या प्रकारचे कागद त्यांच्यासमोर वाचनाकरता आहेत, ते पाहाता त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर किती परिणाम होत असेल ह्याचा विचार केला जात नाही हे उघड आहे. शंभर-दीडशे वर्षे धुळीच्या आवरणाखाली लपलेले कागद उलगडताना, जीर्ण पानांच्या तुकड्यांमधून नाका-तोंडात गेलेल्या धुळीमुळे श्वासोच्छवासावर झालेला परिणाम, भिंगातून मोठ्या आकारात पाहिले तरी न कळणारे गुंतागुंतीचे अक्षर सतत वाचताना डोळ्यांवर येणारा ताण, जन्म-मृत्यू नोंदींमधील शेऱ्याचा तपशील वाचून होणारी मनाची विषण्ण अवस्था, आणि सतत एका जागी बसून राहिल्यामुळे आखडणारे स्नायू ह्या सर्व अडथळ्यांवर मात करून जर मोडी वाचक अहोरात्र काम करत असतील तर त्यांनी वाढवून मागितलेल्या मानधनाच्या मागणीवर विचार व्हायला हवा. मान्य केलेले मानधनही त्यांना वेळेवर मिळत नसेल तर त्यांनी नवीन काम स्विकारण्यासाठी उत्साह कुठून आणि कसा आणायचा?