me

मोडी लिपीची तोंडओळख

देवनागरी लिपीची जलद लिपी म्हणून मोडी लिपी ओळखली जाते. मोडी लिपीचा उदय १२ व्या शतकाच्या सुमारास यादवांच्या काळात झाला. यादवांच्या दरबारामध्ये श्रीकरणाधीप या हुद्द्यावर काम करणार्‍या हेमाडपंतांनी मोडीची सुरूवात केली, असे मानले जाते. व्यावहारिक पत्रलेखन करताना लेखणी कमीत कमी वेळा उचलून भरभर लिहीता यावे म्हणून या लिपीची निर्मिती झाली असल्याने या या लिपीमध्ये शिरोरेघ, इकार व उकारांतील र्‍हस्व,-दीर्घ, शब्दतोड, तसेच पूर्णविराम ह्यासारख्या शुद्धलेखनाच्या बाबींकडे विशेष लक्ष पुरवलेले दिसत नाही.

मोडी लिपीतील सर्व ईकार दीर्घ असतात व सर्व उकार र्‍हस्व असतात. देवनागरी लिपीप्रमाणे प्रत्येक शब्दावर शीरोरेघ न देता, एकच शिरोरेघ कागदाच्या एका टोकापसून दुसर्‍या टोकापर्यंत आखली जाते व मजकूर लिहीला जातो. मजकूर लिहीताना प्रत्येक अक्षर तोडून न लिहीता तो लपेटीयुक्त वळणांनी अक्षरे एकमेकांना जोडून लिहिला जातो. त्यामुळे मोडीतील लेखन वाचताना संदर्भ लावून वाचावे लागते. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मोडी लिपीच्या या वैशिष्ट्यांमुळेच तिला पिशाच्च लिपी असे देखील गंमतीने म्हटले जाते.

आज महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाच्या शाखांमध्ये करोडो मोडी कागदपत्रे लिप्यंतराची वाट पाहात धूळ खात पडून आहेत. केवळ ऐतिहासिक लेखनच नव्हे, तर आजदेखील बर्‍याच लोकांकडे त्यांच्या आजोबा-पणजोबांच्या काळातील मोडी लिपीमध्ये लेखन केलेले कागद जतन करून ठेवले आहे.त्यात काय लिहिले आहे, हे जाणून घेण्याकरीता मोडी तज्ज्ञांना पाचारण केले जाते.

मात्र मोडी लिपीमध्ये केलेले लेखन हे जलद व शुद्धलेखनाचे नियम न पाळता केलेले असल्याने वाचण्यास क्लिष्ट जाते. याचसाठी मोडी लिपीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ऐतिहासिक कागदपत्रांमधील मजकूर समजून घेणे आवश्यक ठरते.