me

माझ्याबद्दल

मी महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालय प्रमाणपत्र धारक व्यावसायिक मोडी लिप्यंतरकार आहे. माझ्या कामाचे स्थायी ठिकाण दादर पारसी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. मुंबईव्यतिरिक्त, ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा व दिल्ली येथील मोडी दस्तऐवजांच्या लिप्यंतराचे कामही मी करत आहे.

मोडी लिपीमध्ये लिहिलेले शिवकालिन, पेशवेकालिन, आंग्लकालिन (ब्रिटीशकालिन) तथा अर्वाचिन काळातील दस्तऐवज लिप्यंतर करण्याचे ज्ञान मला अवगत आहे.

आंग्लकाळात (British East India Company च्या आमदनीत) लिहिलेले गेलेले इनाम कमिशन बक्षीसपत्र, गहाणखत, दानपत्र, वाटणीपत्र, सात-बारा उतारे, तसेच घरगुती पत्रे, खाजगी पत्रे यांचे मी लिप्यंतर करून दिलेले आहे...पुढे वाचा

शिवछत्रपतींचे अप्रकाशित पत्र

दि. ९ जुलै २०१८ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे झालेल्या पाक्षिक सभेमध्ये इतिहास संशोधक श्री. घन:श्याम ढाणे यांनी धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरामधील दफ्तरखान्यामधून स्वत: शोधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रकाशित पत्राचं वाचन केले. ह्या सभेला डॉ. रजनी इंदूलकर, मंडळाचे सचिव आणि इतिहास संशोधक श्री पांडूरंग बलकवडे, उपाध्यक्ष बि.डी. कुलकर्णी आणि विश्वस्त डॉ. सचीन जोशी यांच्यासह इतिहास संशोधक कै. निनाद बेडेकर यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. मंडळाच्या सदस्यांसोबतच इतिहास अभ्यासकांनीदेखील ह्या सभेला हजेरी लावली.

आजवर शिवछत्रपतींची २७३ पत्रे उपलब्ध आहेत, त्यापैकी १०३ पत्रे पाहता येतात आणि इतर पत्रांचे तर्जुमे (आशय-विषयानुसार लिहिलेला सारांश) उपलब्ध आहेत. त्या पत्रांच्या यादीव्यतिरिक्त सापडलेले असे हे अप्रकाशित पत्र आहे. शिवछत्रपतींची पत्रे खंड २ ह्या ग्रंथात पान क्र. ३३८ ते ३५० वर देवनागरी लिप्यंतरासह ज्या महजराची माहिती दिलेली आहे, त्या महजरामध्ये ज्या पक्षाच्या बाजूने निकाल लागला त्या पक्षाला महाराजांनी दिलेला कौलनामा म्हणजेच घन:श्याम ढाणेंनी उजेडात आणलेले हे पत्र!