me
कोरोना प्रतिबंधक काळजी घेण्यासाठी किमान जनसंपर्क बंधने शिथिल करण्याबाबत शासनाकडून पुढील सूचना येईपर्यंत आम्ही फोन, ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काम स्वीकारत आहोत.

मोडी लिपी समज आणि गैरसमज

मोडी लिपी महाराष्ट्रातील प्रत्येकाला अवगत नसली तरी सर्वांच्या परिचयाची नक्कीच आहे. ज्यांनी मोडी लिपीचे प्रशिक्षण घेतलेले नाही अश्या व्यक्तिंसोबतच मोडी लिपीचा नुकताच अभ्यास सुरू केलेल्या विद्यार्थ्यांना ह्या लिपीबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्या उस्तुकततेमधून अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. त्यातील सत्यासत्यता पारखून घेण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न:

१. मोडी ही भाषा आहे.
वास्तव: मोडी ही भाषा नसून लिपी आहे. ज्याप्रमाणे आजच्या काळात आपण मराठी किंवा हिंदी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करतो किंवा मोबाईलवर संदेश टंकलिखित करताना क्वचित प्रसंगी रोमन लिपीचा वापर करून "इंग्रजीतून मराठी" लिहितो, त्याचप्रमाणे आधी मोडी लिपीचा वापर केला जात असे.

२. मोडी लिपी म्हणजे शॉर्टहॅन्डचं दुसरं रूप आहे.
वास्तव: मोडी लिपी हे शॉर्टहॅन्डच रूप नसून, रनिंग लिपीचं रूप आहे. लपेटीयुक्त लेखन हे मोडीचं वैशिष्ट्य आहे.

३. मोडी लिपीचा शोध हेमाडपंतांनी लावला.
वास्तव: यादवांच्या काळापासून मोडी लिपीच्या अस्तित्वाची ओळख पटत जाते हे खरं असलं तरी यादवांच्या करणाधीपांनी म्हणजे हेमाडपंतांनी मोडी लिपीचा शोध लावला असं खात्रीलायकरित्या म्हणण्याइतके पुरावे अद्याप संशोधकांना सापडलेले नाहीत. कदाचित मोडी लिपीचे प्राचीनत्व अशोकाच्या काळाशी जाऊन भिडू शकते परंतू अद्याप संशोधन सुरू असल्याने तसे ठामपणे म्हणता येत नाही. सबब मोडीचा शोध हेमाडपंतांनी लावला असे म्हणण्याऐवजी त्यांनी मोडी लिपीचा पुरस्कार केला असे म्हणणे आजच्या काळापुरते योग्य ठरेल.

४. मोडी लिपीचा वापर फक्त महाराष्ट्रात केला जात असे.
वास्तव: मोडी लिपी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरदेखील प्रचलित होती. गुजरात, राजस्थान, पंजाब ह्या राज्यांमध्ये मोडी लिपीला निरनिराळ्या नावांनी ओळखले जाते. मोडी लिपीमधील दस्तऐवज ह्या राज्यांत सापडले आहेत. कर्नाटक (तंजावर) प्रांतातदेखील मोडीचे लाखो दस्तऐवज पुरालेखागारात जतन केलेले आहेत. मराठे जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे मोडी लिपी पोहोचली.

५. इंग्रजांमुळे मोडी लिपी बंद पडली.
वास्तव: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडात तयार केलेले अनेक दस्तऐवज ह्या गोष्टीचे प्रमाण आहेत कि ब्रिटिशांच्या काळात मोडी सुरळीतपणे वापरात होती व प्रशासकिय कागदपत्रांच्या लेखनासाठी मोडी लिपीचा वापरदेखील केला जात असे. मोडी लिपी बंद पडली ती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. १९५० साली तत्कालिन ’बॉम्बे स्टेट’चे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर ह्यांनी मोडी लिपीला कुरूप, समजण्यास अवघड आणि अनावश्यक ठरवून शासकीय व्यवहारातून मोडी लिपी बंद करवली.

६. मोडी लिपी छापील-टंकलिखित केली जाऊ शकत नाही.
वास्तव: इ.स. १८०१ साली श्रीरामपूर, बंगाला येथे मोडी लिपीमधील पहिला लाकडाचा कळफलक (lithograph ) तयार करण्यात आला. विल्यम कॅरे (कॅरी) ह्या ख्रिस्ती मशनऱ्याने हा पहिला कळफलक बंगालमधील पंडित बैजनाथ यांची मदत घेऊन तयार केला. बयबलचे ’नवा करार’, रघुजी भोसल्यांची वंशावळ ही पुस्तके त्या काळी मोडी लिपीमध्ये छापली गेली होती.

७. मोडी दस्तऐवजांचे डिजिटायझेशन (अंकरूपण) झाल्यामुळे आता मोडी कागदपत्रे आपोआप लिप्यंतरीत होतात.
वास्तव: ह्या विषयावर संशोधन सुरू आहे. अद्याप असे कोणतेही तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध नाही ज्यायोगे मोडी कागदपत्रे आपोआप लिप्यंतरीत होऊ शकतील. सध्यातरी मोडी कागदपत्रे स्कॅन करून त्यांच्या प्रतिमांचा आकार वाढवून ती वाचता येणे लिप्यंतरकारांना शक्य आहे. भविष्यात वर सांगितलेले तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

८. मोडी लिपीमधील बाराखडी जमली म्हणजे मोडी लिपी वाचता येते.
वास्तव: बाराखडीचा सराव केल्याने मोडी लिपीमधील प्राथमिक वळणांचा अभ्यास पक्का होतो परंतू मोडी लिपीमधील ९९% कागदपत्रे ही हस्तलिखिते असल्यामुळे व्यक्तिपरत्वे हस्ताक्षरात परिवर्तन दिसून येते. संदर्भाने वाचन करणे हा मोडी लिपी वाचनाचा पाया असल्याने प्रांताचा, भाषेचा व लेखनसाधनांचा मोडी लेखनशैलीवर पडलेला प्रभाव अभ्यासल्याशिवाय मोडी लिपीचे वाचन कठीण होऊन बसते.

तुमच्याही मनात मोडी लिपी विषयी काही प्रश्न असतील तर लिहून पाठवा. तुम्हाला योग्य ती माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन.

© कांचन कराई